पायरेन्सच्या आयुर्वेद महाविद्यालयात ‘तंबाखूमुक्ती केंद्र’ कार्यान्वित
◻️ डॉ. सुप्रियाताई ढोकणे यांच्या संकल्पनेतून साकारला उपक्रम
संगमनेर LIVE (लोणी) | ग्रामीण भागातील युवक आणि नागरिकांना तंबाखूच्या घातकमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम विळख्यातून मुक्त करण्यासाठी पायरेन्स संस्थेने एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.
संस्थेच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर येथे आता अत्याधुनिक ‘तंबाखूमुक्ती केंद्रा'ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम व्यसनमुक्त आणि निरोगी समाज घडविण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरणार आहे.
देशभरात तंबाखूच्या अतिसेवनामुळे कर्करोग, हृदयरोग आणि फुफ्फुसांचे गंभीर आजार वाढीस लागले आहेत. या गंभीर समस्येला आळा घालण्यासाठी हे केंद्र केवळ जनजागृतीवर भर न देता, प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार करणार आहे. या केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांची एक विशेष टीम कार्यरत असेल, ज्यात डॉ. महेश राजूर, डॉ. चित्रा के. यांच्यासह आठ तज्ज्ञांचा समावेश आहे. येथे रुग्णांना वैयक्तिक समुपदेशन, उपचार आणि मानसिक आधार दिला जाणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. पायरेन्स संस्थेने यापूर्वी यशस्वीपणे ‘प्लास्टिकमुक्त परिसर अभियान’ राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आता '‘तंबाखूमुक्त समाज’ निर्मितीचा निर्धार संस्थेने केला आहे.
संस्थेचे संचालक आणि सचिव डॉ. निलेश बनकर यांनी सांगितले की, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांत काम करताना युवकांना निरोगी ठेवणे हे आमचे ध्येय आहे. या उपक्रमामुळे युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यास मोठी मदत होईल.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना साठे यांनीही या केंद्राच्या माध्यमातून अनेकांना नवजीवन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल भविष्यात खऱ्या अर्थाने आरोग्यदायी क्रांती घडवून आणेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.