इस्रायलमध्ये दरमहा २ लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी!

संगमनेर Live
0
इस्रायलमध्ये दरमहा २ लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी!

◻️ ​जिल्ह्यातील युवकानां २ हजार ५०० रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन 

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | परदेशात करिअर करण्याची इच्छा असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात झालेल्या विशेष करारानुसार, इस्रायलमध्ये 'गृहआधारित काळजीवाहक' या पदांसाठी तब्बल २ हजार ५०० रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय चलनानुसार दरमहा सुमारे दोन लाख रुपये इतके आकर्षक वेतन मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही नियुक्ती इस्रायलमधील सुरक्षित आणि युद्धग्रस्त नसलेल्या भागात केली जाणार असल्याने उमेदवारांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

​या भरतीसाठी पात्रतेचे निकष ठरवण्यात आले असून, २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेमध्ये ज्या उमेदवारांनी नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स सहाय्यक किंवा प्रसूती परिचर्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच जी.डी.ए., ए.एन.एम., जी.एन.एम., बी.एस्सी. नर्सिंग किंवा पोस्ट बी.एस्सी. नर्सिंग यांसारखी शैक्षणिक अर्हता असलेले तरुणही या संधीचा लाभ घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, उमेदवारांनी भारतीय नियामक प्राधिकरणाने मान्यता दिलेला किमान ९९० तासांचा काळजीवाहक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. परदेशातील कामाचे स्वरूप लक्षात घेता, उमेदवारांना इंग्रजी भाषेचे किमान ज्ञान आणि सामान्य ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

​निवड प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ भरघोस पगारच नव्हे, तर इतरही अनेक सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय विमा तसेच राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय विभागामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातून निवड प्रक्रिया पूर्ण करणे, आरोग्य तपासणी, व्हिसा आणि पासपोर्ट मिळवणे यासाठी कौशल्य विकास विभागाकडून संपूर्ण मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत पुरवली जाईल. ही एक प्रकारे जिल्हयातील तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

​इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी 'महाराष्ट्र इंटरनॅशनल' या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश उगले यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !