“दूध का दूध और पानी का पानी करणारे बाळासाहेब थोराताचे नेतृत्व” - हर्षवर्धन सपकाळ

संगमनेर Live
0
“दूध का दूध और पानी का पानी करणारे बाळासाहेब थोराताचे नेतृत्व” - हर्षवर्धन सपकाळ

◻️​ संगमनेरच्या सहकार क्षेत्राला ‘दीपस्तंभ' मानून कार्यकर्त्यांना दिला संघर्षाचा कानमंत्र

​संगमनेर LIVE | “सातत्याने जनतेसाठी काम करणारी पक्षनिष्ठा, शुध्द आचार-विचार आणि पारदर्शक व्यवहार असणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची आज संपूर्ण राज्याला नितांत गरज आहे," असे प्रतिपादन कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संगमनेर येथे केले. ते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा उल्लेख करताना सपकाळ म्हणाले की, “राजकारणात चढ-उतार येत असतात, पण बाळासाहेब थोरात हे कॉग्रेसचे एकनिष्ठ नेतृत्व आहे. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. संगमनेरकरांच्या मनात जे आहे, तेच माझ्याही मनात आहे. नियतीच्या मनात नक्कीच काहीतरी चांगले संकेत असून, भविष्यातील टप्पा निश्चितच मोठा असेल.” असे भाष्य केले.

भाजप प्रणित सरकारवर टीका करताना सपकाळ यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ असा उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘देशात वाढलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतमालाला नसलेला भाव आणि महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. देवाधर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अर्थव्यवस्थेची घसरण झाली असून बॅकांमध्ये खडखडाट झाला आहे. अशा परिस्थितीत काॅग्रेसच्या कार्यकर्त्यानी संघर्षाची भूमिका घेऊन मैदानात उतरले पाहिजे.”

काॅग्रेसचे काम अधिक तळागाळापर्यत पोहोचवण्यासाठी ‘संघटना सृजन अभियाना'च्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात मतदार यादी पुनर्रिक्षण मोहिमेत प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यानी जबाबदारी घेऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बाळासाहेब थोरात यांनीही यावेळी सरकारवर निशाणा साधला. “सध्या डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी संकटात आहे. खरीप हंगाम जवळ आला असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे. कार्यकर्त्यानी बीएलओ च्या धर्तीवर काम करून एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी," अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्याना दिल्या.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारातून उभ्या राहिलेल्या संगमनेरच्या सहकार क्षेत्राचे कौतुक करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “दूध का दूध और पानी का पानी करणारे पारदर्शक नेतृत्व म्हणजे बाळासाहेब थोरात. सर्वसामान्यांचा विकास हाच कॉग्रेसचा विचार असून, त्यांचे कार्य सर्वच कार्यकर्त्यासाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी आहे.” असे गौरवोद्गार काढले.

दरम्यान, ​यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !