भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संगमनेर Live
0
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

◻️ शिर्डीत ‘निबे उद्योग समूहा’च्या तोफगोळा उत्पादन आणि सीएनजी प्रकल्पाचे उध्दघाटन 

संगमनेर LIVE (शिर्डी) | संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कंपन्यांकडून होणारे संशोधन हे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांना अधिक मजबूत करीत असल्याने केंद्र सरकारनेही खासगी उद्योगांना पाठबळ देऊन सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. खासगी उद्योगाचे सामर्थ्य जेवढे वाढेल तेवढी सुरक्षा अधिक मजबूत होईल. यातून भारत देश संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल, असा विश्‍वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ‘निबे उद्योग समूहा’च्या वतीने विकसित करण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन आणि सीएनजी प्रकल्पाचे उध्दघाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, अनुप सिंघल, डीआरडीओचे सेक्रेंटरी डॉ. समीर कामत, केंद्रीय सचिव संजीव कुमार, ब्रह्मविहारीजी महाराज, आमदार राणा जगजितसिंह, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार आशुतोष काळे, आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह संरक्षण आणि उद्योग विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पाचे प्रवर्तक गणेश निबे उपस्थित होते.

आपल्या भाषणात गणेश निबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करून मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “येथे आल्यानंतर या प्रकल्पाचे महत्त्व आपल्याला समजले. भारतामध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नाही. असलेल्या साधनांचा उपयोग करून, बुध्दिमत्तेच्या जोरावर भारत देशाला निर्यातदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.” हे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. सुशासन आणि स्वाभिमानाचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेचे मॉडेल शिवाजी महाराजांनी निर्माण करून दाखविले. लढाईसाठी लागणारे साहित्यही त्यांनी स्‍थानिकांकडून बनवून नवे साम्राज्य उभे करून दाखविले. हीच भूमिका लोकमान्य टिळकांची होती. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा संदेश देणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीने आता संरक्षण व्यवस्थेतही खासगी उद्योगांच्या माध्यमातून एक नवा विश्‍वास निर्माण केला आहे.

संरक्षण उद्योग मजबूत होण्यासाठी खासगी उद्योगाला केंद्र सरकारने पाठबळ देण्याचे धोरण घेतले आहे. यामुळे धोरणात्मक सुधारणा होत असून थेट परकीय गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळत आहे. परवाना प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्वदेशी नीतीला चालना मिळत असल्यामुळेच खासगी उद्योग समूहांचा सहभाग संरक्षण उत्पादनामध्ये चांगल्या पध्दतीने वाढला आहे. हा वाटा आता २५ ते ३० टक्क्यांवर पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले.  आधुनिक तंत्रज्ञान आणि बुध्दिमत्तेचा वापर करून, खासगी उद्योग समूह करीत असलेली वाटचाल ही ऊर्जा निर्माण करणारी असून, यातूनच विकासाचा रोडमॅप तयार होत आहे. निबे उद्योग समूह यासाठीचे मोठे उदाहरण असून, या उद्योग समूहातून निर्माण होणारे संरक्षण साहित्याचे उत्पादन पाहता हा उद्योग समूह देशासाठी अनेक वर्षांचा माईलस्टोन ठरेल.

भारताचे सामर्थ्य हे आता शिर्डीच्या भूमीतूनही सिध्द होणार आहे. हा उद्योग केवळ उत्पादनासाठी मर्यादित नाही, तर यातून अर्थव्यवस्था मजबूत होईलच, पण औद्योगिक स्थिरताही मिळेल. अनेक खासगी कंपन्या आता संरक्षण उत्पादनामध्ये भागीदारी करण्यासाठी पुढे येत असल्यामुळे एक 'इको सिस्टिम' निर्माण होत असून, संरक्षण उद्योगही मजबुतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ‘ऑपरेशन सिंदुर मध्ये भारताने आपले सामर्थ्य सिध्द करून दाखविले आहे. भविष्यातही खासगी क्षेत्राच्या माध्यमातून संरक्षण उत्पादनाची निर्मिती चांगल्या पध्दतीने होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजचा दिवस देशाकरिता ऐतिहासिक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' हे जे संदेश दिले होते, ते संरक्षण क्षेत्राने प्रत्यक्षात अमलात आणले आहेत. त्यामुळे देश आता स्वदेशी पध्दतीनें बनविलेल्या उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे.” राज्यात चार डिफेन्स कॉरिडॉर तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. 

यामुळे आता महाराष्ट्र राज्य संरक्षण उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य बनेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथे संरक्षण उद्योग समूह विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. “गणेश निबे यांच्यासारखे युवक या क्षेत्रात करीत असलेले काम भूषणावह आहे. नवीन तंत्रज्ञान आणून देशासाठी काहीतरी निर्माण करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे. आत्मनिर्भर भारताकरिता नवा आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम ‘निबे उद्योग समूह' करीत आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

याप्रसंगी गणेश निबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले. या प्रकल्पाच्या उध्दघाटन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शनाला संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. निबे उद्योग समुह आणि विविध अंतराष्‍ट्रीय कंपन्‍यांमध्‍ये महत्‍वपूर्ण करार करण्‍यात आले. ऑप्‍टीकल सॅटेलाईट आणि ब्‍लॅक स्‍काय कंपनी तसेच सीप्‍लेन निर्मितीसाठी कॅनेडीयन कंपनी हॅवीलॅन्‍ड सोबत स्‍वाक्षरी करण्‍यात आली. 

दरम्यान, हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यानी मोठी गर्दी केली होती. उध्दघाटन सोहळ्यापूर्वी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांच्या लेफ्टनंट जनरलनी विद्यार्थी, नागरिक आणि विज्ञानप्रेमींशी संवाद साधला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !