सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनात बाजार भावाप्रमाणे मोबदला द्या!
◻️ आमदार खताळ यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; फेरमूल्यांकनाचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
संगमनेर LIVE | सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला अत्यंत कमी असल्याने संगमनेर तालुक्यातील शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. या अन्यायकारक नुकसान भरपाईचा फेरविचार करून समृध्दी महामार्गाप्रमाणे वाढीव आणि न्याय्य मोबदला मिळावा, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी पालकमंत्री नामदार विखे पाटील उपस्थित होते.
तालुक्यातील वडझरी बु।।, अजमपूर, आरमपूर, चिंचोली गुरव, चिंचपूर खुर्द, हसनाबाद, जुनेगाव, कसारे, लोहारे, सातपूर, तळेगाव आणि वडझरी खुर्द या गावांच्या हद्दीतील सुपीक शेतजमिनी महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनी निळवंडे कालव्याच्या सिंचनाखाली असून, तिथे ऊस, डाळिंब आणि फळबागांसारखी नगदी पिके घेतली जातात. स्थानिक बाजारभावानुसार या जमिनींचा दर एकरी २५ ते ३० लाख रुपये असताना, शासनाकडून मात्र काही ठिकाणी १० लाख रुपयांपेक्षाही कमी मोबदला जाहीर झाला आहे. एका शेतकऱ्याला केवळ २४ गुंठ्यांसाठी ५ लाख ९ हजार रुपये मोबदला मिळाल्याचे उदाहरण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आमदार अमोल खताळ यांनी आणून दिले.
शेतकऱ्यांनी शासनाकडे जमिनीचे वास्तव मूल्यांकन करून पुन्हा निवाडा करण्याची मागणी केली आहे. समृध्दी आणि पालखी मार्गाप्रमाणेच या प्रकल्पातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अनेकपटीने मोबदला मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी लावून धरली आहे. तसेच, 'फेअर कम्पेन्सेशन ‘अॅक्ट २०१३' मधील तरतुदीनुसार बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळावा, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. भूसंपादनामुळे अनेक कुटुंबांचा उपजीविकेचा मुख्य आधार हिरावला जाणार असून, या महामार्गामुळे होणाऱ्या औद्योगिक व व्यावसायिक विकासाचा मोठा लाभ सरकारला होणार आहे, मग शेतकऱ्यांना मात्र तुटपुंजी रक्कम का, असा सवालही उपस्थित होत आहे.
शिर्डी येथे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.