दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झालेल्या कुटुंबांचे बाळासाहेब थोरातानी केले सांत्वन
◻️ वर्षभरापूर्वी वडिलांचे छत्र हरपले, आता सानप कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
संगमनेर LIVE | शुक्रवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. महेश गोरखनाथ सानप (वय १८) आणि ओमकार गोरखनाथ सानप (वय १४) अशी या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काही काळापूर्वीच या दोन भावंडांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले होते. कुटुंबाचा आधारस्तंभ हरवल्यानंतर आता अवघ्या काही महिन्यांतच घरातील दोन तरुण मुलांचा असा आकस्मिक अंत झाल्याने संपूर्ण सानप कुटुंबीय उद्ध्वस्त झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः तिगाव येथे जाऊन सानप कुटुंबीयांची भेट घेतली. मयत मुलांच्या मातोश्री मनीषा सानप आणि इतर नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी बोलताना मंत्री थोरात म्हणाले की, “ही घटना अत्यंत क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे. एकाच कुटुंबावर ओढवलेला हा आघात मनाला पिळवटून टाकणारा आहे.”
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी तातडीने कृषि आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सानप कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, या कठीण प्रसंगात गावातील नागरिक, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी सानप कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आणि तरुण मुलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही मंत्री थोरात यांनी नमूद केले.