दगडाच्या खाणीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
◻️ संगमनेर तालुक्यातील अंगावर काटा आणणारी घटना; तिगाव गाव हादरले
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील ‘तिगाव' येथे शुक्रवारी (दि. २२) दुपारी घडलेल्या दुर्देवी घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिगाव येथील महेश गोरखनाथ सानप (वय १८) आणि ओमकार गोरखनाथ सानप (वय १४) हे दोन भाऊ दुपारी घराबाहेर पडले होते. यावेळी त्यांनी जवळच असलेल्या दगडाच्या खाणीत पोहण्याचा निर्णय घेतला. मात्र, खाणीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात खोलवर गेले आणि त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
ही बातमी गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य करत दोघांनाही पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
एकाच घरातील दोन तरुण मुलांच्या अकाली मृत्यूने सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तिगाव परिसर आणि संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेची नोंद संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित महाजन पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पावसाळा किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी साचलेल्या खदाणी किंवा विहिरींमध्ये पोहण्यासाठी जाणे जीवघेणे ठरू शकते. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल. असे आवाहन करण्यात आले आहे.