संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळाली पाहिजे - बाळासाहेब थोरात
◻️ थोरात कारखान्याचा खांडगाव येथे ऊस मेळावा संपन्न
संगमनेर LIVE | “अनेक अडचणींवर मात करून आपण निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण केले आहेत. संगमनेर तालुक्याने पाण्यासाठी नेहमीच मोठा संघर्ष केला असून, या धरणातील ६० टक्के पाणी संगमनेरच्या हक्काचे आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार रोटेशनच्या काळात शेतकऱ्यांना ११ तास वीज मिळालीच पाहिजे. या हक्कासाठी वेळप्रसंगी सर्वाना एकत्र येऊन पुन्हा संघर्ष करावा लागेल,” असा इशारा काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
खांडगाव येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्या'च्या वतीने आयोजित भव्य ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता टिकवून एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला संघर्षाचा मोठा इतिहास आहे. निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी आपण जीवाचे रान केले. सध्या डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सुरू असून, डाव्या कालव्याच्या काॅक्रिटीकरणामुळे पाणी वेगाने पुढे जात आहे. मात्र, पाणी शेतात पोहोचवण्यासाठी रोटेशन काळात किमान ११ तास वीज मिळणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी आणि कार्यकर्त्यानी सज्ज राहावे.
ऊस आणि दूध हे शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. तीच जमीन, तेच पाणी आणि कमी कष्टात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणे सहज शक्य आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या समृध्द होईल. तालुक्याने १५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्यास आपला कारखाना स्वयंपूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे सर्वाधिक दर देणे शक्य होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कृषि शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपूर्वी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी शेतातील पाचट जाळून न टाकता त्याचा खत म्हणून वापर करावा, कारण पाचटामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असल्याने ते जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरते. यासोबतच शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाण्यांची निवड करावी, पारंपरिक पध्दतीऐवजी ठिबक सिंचन आणि ठिबकद्वारे खत व्यवस्थापन (फर्टिगेशन) यावर भर द्यावा. तसेच ऊस लागवड करताना दोन सरींमधील अंतर पाच फूट राखल्यास पिकाला खेळती हवा आणि योग्य सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते, असे सांगितले.
ऊस लागवडीचे व तोडणीचे योग्य नियोजन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची नोंदणी किमान ३ महिने आधी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत माती परीक्षण, ऊस बेणे निवड आणि औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मोफत व योग्य मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
दरम्यान या ऊस विकास मेळाव्यास तालुक्यातून ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी मानले.