भोजापूर सह तळेगाव भागातील गावे दुष्काळमुक्तीकडे - नामदार विखे पाटील

संगमनेर Live
0
भोजापूर सह तळेगाव भागातील गावे दुष्काळमुक्तीकडे - नामदार विखे पाटील 

◻️ तळेगाव आणि पारेगाव येथे सौर प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

संगमनेर LIVE | भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा - वैतरणा - गोदावरी प्रकल्पात करण्यात आला असून, यासाठी १२ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भोजापूर लाभक्षेत्रासह तळेगाव भागातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे महावितरणच्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच पारेगाव खुर्द येथील पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमोल खताळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार विखे पाटील म्हणाले, “सध्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाच्या वतीने पाण्याचे नियोजनबध्द वितरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तळेगावपर्यत पाणी आणण्यासाठी भोजापूर चारीच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नदीजोड प्रकल्पांतर्गत दमणगंगा-वैतरणा-गोदावरी यामध्ये भोजापूर चारीचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी असा निर्णय कधीही झाला नव्हता. यामुळे तळेगाव परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पाचे पाणी तळेगाव परिसरातील खालच्या पट्ट्यापर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यामुळे या दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे," असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात नव्या उद्योगांसाठी गुंतवणूकदार उत्सुक असून जमिनीची मागणी वाढत आहे. शिर्डी येथे लवकरच एका मोठ्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. तरुणांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन जिल्ह्यात रतन टाटा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या माध्यमातून तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशा प्रकल्पांमुळे आगामी पिढीचे भविष्य उज्ज्वल होणार असल्याने युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना.विखे पाटील यांनी केले.

आमदार अमोल खताळ म्हणाले, “या नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे भागवतवाडी, वामनवाडी, जुने गाव आणि काकडवाडी परिसरातील सुमारे ९०० शेतकऱ्यांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पूर्ण दाबाने थ्री-फेज वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवसा वीजपुरवठा मिळण्याची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे रात्री शेतीला पाणी देण्याचा त्रासही कमी होणार आहे."

“निळवंडे धरणाचे पाणी देऊन तळेगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यात आली आहे. तसेच बिरोबा देवस्थानच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्यामुळे या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे,” असे आमदार खताळ यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !