◻️ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई
संगमनेर LIVE | महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीस कायदेशीर बंदी असतानाही, संगमनेर शहरात छुप्या पध्दतीने कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी मदिनानगर भागात धाडसी कारवाई करत २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एकूण १२ गोवंश जनावरांची सुटका केली. याप्रकरणी एका संशयिताविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी सायंकाळी १८:४० वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, मदिनानगर गल्ली नं. १ येथील हावडा ब्रिज नाल्याशेजारील काटवनात काही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवण्यात आली आहेत. ही माहिती मिळताच तातडीने पोलीस नाईक बापुसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हे कृत्य उघडकीस आणले.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना त्या ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्थेत बांधलेली जिवंत गोवंश जनावरे मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी २० हजार रुपये किमतीची १० जनावरे आणि ३० हजार रुपये किमतीची २ जनावरे, असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेली सर्व जनावरे काळ्या-पांढऱ्या रंगाची असून ती सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आहेत.
घटनास्थळावर उपस्थित असलेल्या व्यक्तींने दिलेल्या माहितीनुसार, ही जनावरे सय्यद राजमोहंमद सय्यद आरिफ (रा. मदिनानगर, संगमनेर) याने बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी तिथे आणली असल्याचे निष्पन्न झाले. यावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१४/२०२६ नुसार, ‘महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५)’ आणि ‘प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.