नसरापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये जनसागर लोटला!
◻️ आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्या, राज्यात महिला असुरक्षित - डॉ. जयश्री थोरात
संगमनेर LIVE | पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर वृध्द नराधमाने केलेल्या पाशवी अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात भव्य ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला.
शहरातील बसस्थानक परिसरातून निघालेल्या या मोर्चात महिला, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातामध्ये मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेऊन निघालेल्या या जनसमुदायाने नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी केली.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. जयश्री थोरात यांनी सरकारवर कडक ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय होणे ही राज्यासाठी काळीमा फासणारी गोष्ट आहे. आपण विकसित आणि प्रगत भारताच्या गप्पा मारतो, मात्र याच देशात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. गुन्हेगाराला कोणताही जात-धर्म नसतो, अशा नराधमाला कायद्याचा धाक बसण्यासाठी तात्काळ मृत्युदंडाचीच शिक्षा झाली पाहिजे.”
वडगाव पान येथील चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी संताप व्यक्त केला. “ॲसिड हल्ल्याला ४५ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट आहेत, हे प्रशासनाचे अपयश आहे. ज्याप्रमाणे शिवकाळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे चौरंगा केले जायचे, त्याच धर्तीवर आताच्या काळातही अत्यंत कठोर कायदे करून जलदगतीने निकाल लागणे गरजेचे आहे,” अशी मागणी त्यांनी केली.
या कॅन्डल मार्चमध्ये डॉ. जयश्री थोरात यांच्यासोबत सौ. दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांसह संगमनेरमधील प्रमुख पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोर्चाच्या शेवटी, उपस्थित असलेल्या लहान मुलींच्या हस्ते प्रांताधिकारी अरुण उंडे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.