जनता दरबारातून मंत्री विखे पाटलांचा ‘जनसेवेचा’ धडाका!
◻️ वीज, पाणी आणि रस्ते प्रश्नांवर तात्काळ कारवाईचे अधिकाऱ्यांना आदेश
संगमनेर LIVE (लोणी) | जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आलेल्या प्रत्येक अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्धारित वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मंत्री विखे पाटील महिन्यातून एकदा जनता दरबाराचे आयोजन करून जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांचे प्रश्न समजावून घेतात. रविवारी (दि. ७) प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात मंत्री विखे पाटील यांनी आलेल्या सर्वच नागरिकांशी संवाद साधून त्यांची निवेदने स्वीकारली. रस्ते, पाणी, वीज, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. प्राप्त झालेल्या काही अर्जांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
प्राप्त झालेले सर्व अर्ज संबंधित विभागाच्या कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत. अर्जावर आठवडाभरात कार्यवाही करून त्याचा अहवाल माझ्या कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. प्रामुख्याने वीज वितरण कंपनीच्या संदर्भात असलेल्या समस्यांबाबत मंत्री विखे पाटील यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात ग्रामस्थांना विश्वासात घेऊन याबाबतचे निर्णय करावेत असे सूचित करून, मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा आपण लवकरच घेणार असून, आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षताही घेण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सद्यपरिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढलेलीच आहे, ज्या गावांना टॅकरची मागणी आहे अशा गावांना टॅकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहामध्ये मंत्री विखे पाटील यांनी प्रत्येक गावातून आलेल्या शिष्टमंडळाला स्वतंत्र वेळ देऊन गावनिहाय प्रश्न समजावून घेतले. व्यक्तिगत अडचणी असलेल्या नागरिकांची निवेदने स्वीकारत त्यांनी याबाबत तातडीने निर्णय करण्याबाबतही आश्वासित केले.
प्रामुख्याने नोकरीच्या संदर्भातील प्राप्त झालेल्या अर्जांबाबत जिल्हास्तरावर धोरणात्मक निर्णय करण्यात येणार असून, सद्यपरिस्थितीत सुरू असलेल्या उद्योजकांकडे त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व उमेदवारांच्या शिफारशी करण्यात येतील. औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून कौशल्य प्रशिक्षण घेण्याबाबतही त्यांनी आलेल्या युवकांना सूचित केले. जनता दरबारास श्रीरामपूर, राहाता, संगमनेर तसेच जिल्हास्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.