रामराज्य हे सदाचार आणि संस्कारावर उभे राहते - ढोक महाराज

संगमनेर Live
0
रामराज्य हे सदाचार आणि संस्कारावर उभे राहते - ढोक महाराज

◻️ ​गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेचा समारोप

​संगमनेर LIVE | “रामराज्य हे शस्त्राच्या बळावर नव्हे, तर शास्त्र, संस्कार आणि सदाचाराच्या आधारावर उभे राहते. धर्मकार्यासाठी दृढ इच्छाशक्ती आवश्यक असून, इच्छाशक्तीशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकत नाही. बंधुभाव हा रामायणाचा खरा आदर्श आहे," असे प्रतिपादन रामायणाचार्य ढोक महाराज यांनी केले.

​संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित रामकथेचा समारोप झाला. या वेळी आपल्या मधुर आणि ओजस्वी वाणीतून ढोक महाराजांनी रामायणातील युध्दकांड व रामराज्य स्थापनेचे प्रभावी निरूपण केले.

लंकाकांडाचे वर्णन करताना महाराजांनी राम-रावण युध्दाचे प्रसंग श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत केले. रामसेतूचे महत्त्व सांगताना त्यांनी सांगितले की, ‘रा’ आणि ‘म’ लिहिलेले दगड समुद्रावर तरंगले आणि अवघ्या पाच दिवसांत शंभर योजनांचा सेतू पूर्ण झाला. हे रामनामाच्या अगाध शक्तीचेच प्रतीक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

युध्दकांडातील अंगदशिष्टाई, इंद्रजिताचे युध्द आणि लक्ष्मण मूर्च्छित झाल्यानंतरचा प्रसंग सांगताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. संजीवनी आणण्यासाठी हनुमानाचे प्रयाण आणि त्यानंतर प्रभू रामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय कसा प्रस्थापित केला, याचे वर्णन त्यांनी अत्यंत रसाळ भाषेत केले.

चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतलेल्या प्रभू रामांचे गुरु, माता आणि बंधूंशी झालेले मिलन हे अत्यंत हृदयस्पर्शी होते. रामायणाचा खरा संदेश गुरूमिलन, मातृभक्ती आणि त्याग यामध्ये दडलेला आहे, असे सांगत त्यांनी राम राज्याभिषेकाचा अर्थ धर्म, न्याय आणि लोककल्याणाचा विजय असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, ​या सोहळ्याला तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मकार्यासाठी सज्ज राहण्याचा संदेश देऊन या रामकथेचा भावपूर्ण समारोप झाला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !