पुणे-शिर्डी दरम्यानच्या पहिल्या रेल्वेसेवेचे रेल्वेमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडून उध्दघाटन
◻️ पुणे - शिर्डी रेल्वेसेवेचे डॉ. सुजय विखे पाटलांकडून स्वागत
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | पुणे आणि शिर्डी या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी पहिली थेट रेल्वेसेवा आज बुधवारी (दि. १७ जून) सुरू करण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उध्दघाटन पार पडले. या सुविधेमुळे आता भाविक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर होणार आहे.
शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक असून, येथे देश-विदेशातून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आतापर्यंत पुणे ते शिर्डी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. या थेट रेल्वेसेवेमुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून साईभक्तांचा प्रवास सुसह्य होणार आहे, अशी भावना भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
दररोज धावणारी ही रेल्वे पुणे, अहिल्यानगर, राहुरी आणि श्रीरामपूर मार्गे शिर्डीपर्यंत धावणार असून, यामुळे केवळ भाविकांचाच नव्हे, तर विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिकांचाही मोठा फायदा होणार आहे. या रेल्वेसेवेमुळे पुण्यातील शैक्षणिक हबपर्यंत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी सोपे होणार आहे, तर पुण्यातील प्रगत वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. त्याचप्रमाणे, दळणवळण सुलभ झाल्यामुळे व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चांगली गती मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलत आहे. वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या आणि नवीन रेल्वेमार्गांमुळे भारतीय रेल्वे आधुनिक होत आहे. पुणे-अहिल्यानगर-शिर्डी रेल्वे ही याच विकासाभिमुख भूमिकेचा भाग असून, हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी नमूद केले. या रेल्वेसेवेमुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याने पुणे आणि अहिल्यानगर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.