मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई!
◻️“चुकीला माफी नाही”; डॉ. विखे पाटलांनी दिलेला शब्द पाळला
संगमनेर LIVE (राहाता) | राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. या गंभीर घटनेनंतर पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. प्रशासनाने आज संबंधित आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवून कारवाई केली.
शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर सर्वत्र रोष व्यक्त केला जात होता. घटनेची माहिती मिळताच डॉ. सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. “महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही,” असा कडक इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली आणि तातडीने कारवाई करण्यात आली.
पोलीस, महसूल आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली. आरोपीच्या मालकीचे अनधिकृत बांधकाम बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून, महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन गंभीर असल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.
या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “पीडितेला न्याय मिळवून देणे आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर धडा शिकवलाच पाहिजे. अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.”
दरम्यान या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले असून, पीडित कुटुंबीयांनाही या कठोर कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल, हे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.