नाशिक - पुणे सरळ रेल्वे मार्गाला ‘ब्रेक’ उत्तर महाराष्ट्रात असंतोष
◻️ बाळासाहेब थोरातांकडून निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध!
संगमनेर LIVE | मुंबई - नाशिक - पुणे या ‘गोल्डन ट्रॅगल’ला जोडणारा नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द करण्याच्या केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या विधानामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय असंवेदनशील असून, याविरोधात आता लोकप्रतिनिधी आणि जनतेला एकत्र येऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे मत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक - पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकल्प मंजूर झाला होता. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाटप करण्यात आली आहे. मात्र, सत्तांतरानंतर हा मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला आणि आता तांत्रिक कारणे पुढे करून हा प्रकल्प रद्द केल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “मुंबई - नाशिक - पुणे हा गोल्डन ट्रॅगल विकासाच्या दृष्टीने देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जमिनीचे भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना पैसे दिले गेले असताना आता जीएमआरटीसारखी कारणे सांगून मार्ग रद्द करणे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रस्तावित नवीन पर्यायी मार्गाचा विभागाला कोणताही विशेष फायदा होणार नाही. त्यामुळे हा विषय केवळ राजकारणाचा नसून, पुढील पिढ्यांच्या समृध्दीसाठी आपण सर्वांनी राजकारणापलीकडे जाऊन सरळ रेल्वे मार्गाचा आग्रह धरला पाहिजे.” अशी भूमिका त्यांनी मांडली.
याबाबत आमदार सत्यजित तांबे यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “आम्ही या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, केंद्रीय मंत्र्यांचे विधान हे उत्तर महाराष्ट्राच्या विकासात खो घालणारे पाप आहे. हा निर्णय अत्यंत असंवेदनशील असून, आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो,” असे सांगत त्यांनी या विरोधात संघर्ष समिती स्थापन केल्याची माहिती दिली.
दरम्यान, सध्या या घोषणेनंतर नाशिक, सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, खेड, मंचर या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप पाहायला मिळत आहे.