बांधकाम कामगारांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यावर फौजदारी कारवाई करणार

संगमनेर Live
0
बांधकाम कामगारांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यावर फौजदारी कारवाई करणार

◻️ आमदार अमोल खताळ यांचा साहित्य वाटप कार्यक्रमात एजंटांना सज्जड इशारा

​संगमनेर LIVE | बांधकाम कामगार, घरगुती कामगार, सुतार, इलेक्ट्रिशियन आणि रंगकाम करणारे कामगार हे राज्य व देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. मात्र, या कष्टकरी वर्गाच्या हक्काच्या योजनांवर डल्ला मारणाऱ्या मध्यस्थांची आणि एजंटांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. संगमनेर येथे आयोजित बांधकाम कामगारांना भांडी साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार खताळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. या योजना केवळ कागदावर न राहता त्या गोरगरीब शेतकरी आणि कामगार कुटुंबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे.

गेल्या काही वर्षांत शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक योजनांच्या माध्यमातून संगमनेरातील बांधकाम कामगारांना १२ कोटी २७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सध्या २६ हजार ८९९ कामगारांची नोंदणी झाली असून, पात्र कामगारांनी नोंदणी केल्यास ही संख्या ५० हजारांपर्यंत जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

पठार भागातील मांडवे गावात एजंट कामगारांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित एजंटांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार खताळ यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. माझ्या कामाची पद्धत आवडत नसेल तर अधिकाऱ्यांनी बदली करून घ्यावी, पण कामगारांच्या हक्काचा एक रुपयाही कुणी खाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी कोणत्याही मध्यस्थाला पैसे देऊ नयेत. आमदार जनसंपर्क कार्यालयामार्फत कामगारांची नोंदणी आणि विविध योजनांचे अर्ज पूर्णपणे मोफत भरून दिले जातात. त्यामुळे कामगारांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार खताळ यांनी केले आहे. याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !