संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी

संगमनेर Live
0
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी

◻️ ​आमदार अमोल खताळ यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी

​संगमनेर LIVE | त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संगमनेर तालुक्यात आगमन होत आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करून सर्व सोयीसुविधा तातडीने पूर्ण कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या आहेत.

​पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रण यांसारख्या मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. या बैठकीला संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा विनियोग करून वारकऱ्यांसाठी मुक्काम, स्वच्छ पाणी आणि आरोग्य सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून द्याव्यात.” अशा सूचना त्यांनी दिल्या.

अश्‍विनीनाथ गड परिसरातील पालखी मार्गाची आमदार खताळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करताना वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची स्थिती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असूनही, आपल्या तालुक्यातून जाणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्त्व देऊन आपण स्वतः पालखीच्या स्वागतासाठी मुंबईहून संगमनेरला येणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. 

दरम्यान, वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !