प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’ उभारलेले जाणार
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश; मुख्यमंत्र्याची विधिमंडळात घोषणा
संगमनेर LIVE (मुंबई) | संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यामुळे चिंतेचे वातावरण असताना, स्थानिक युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि सेवन रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र 'अमली पदार्थ विरोधी युनिट’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे.
आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. संगमनेरातील अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथकाची गरज असल्याचे त्यांनी गृहमंत्र्यांकडे आग्रहाने मांडले होते. या धंद्यांना राजाश्रय देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या घातक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यभर व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी युनिट कार्यरत असेल, ज्याच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीचा म्हणजे तस्करी, पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला जाईल. तसेच, दोषींवर विद्यमान कायद्यांतर्गत शून्य सहनशीलतेचे धोरण राबवून अधिक प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे संगमनेरसह संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेला अमली पदार्थांच्या विरोधात लढण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला यापुढे अधिक तत्परतेने आणि प्रभावीपणे पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. अमली पदार्थांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करून युवकांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आता पोलीस यंत्रणेकडून ठोस आणि गतिमान कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.