गांधी विद्यालयाने विद्यार्थी दशेत आयुष्याला दिशा दिली - शरद पवार
◻️ ज्येष्ठ नेते पवारांकडून पद्मश्री डॉ. विखे पाटलांच्या प्रवरानगर येथील आठवणींचे स्मरण
संगमनेर LIVE (लोणी) | “माझ्या सार्वजनिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांची मुहूर्तमेढ प्रवरानगर येथेच रोवली गेली. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात घालवलेला एक वर्षाचा काळ माझ्या आयुष्याला दिशा देणारा ठरला,” अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
रयत शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रवरानगर (ता. राहाता) येथे आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, विविध इमारतींचे उध्दघाटन आणि 'पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार सभागृहा'च्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील होते.
शरद पवार म्हणाले, “गोवा मुक्ती संग्राम आंदोलनाच्या काळात महात्मा गांधी विद्यालयात शिकत असताना, आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवली होती. त्यावेळी आम्ही प्रवरा सहकारी साखर कारखान्यावर जाऊन पद्मश्री विखे पाटील यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी “तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचे काम फक्त शिक्षण घेणे आहे”, असा वडिलकीचा सल्ला दिला होता, तो आजही माझ्या स्मरणात आहे." कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळात शैक्षणिक क्रांती घडवून आणल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, शरद पवार ३७ वर्षांपासून रयतचे नेतृत्व करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एमपीएससीच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केल्याने ग्रामीण भागातील मुलांच्या नोकरीच्या संधी वाढल्या. तसेच, रयतच्या कार्यक्रमांमध्ये हार-तुरे न देता केवळ पुस्तके भेट द्यावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी, खासदार निलेश लंके, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संदिप वर्पे, अरूण कडू, मीनाताई जगधने यांच्यासह रयतचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब म्हस्के यांनी केले.