साई प्रसादालय आणि लाडू निर्मिती केंद्राबाबत कारवाईची खोटी अफवा
◻️ श्री साईबाबा संस्थानकडून ‘२४ न्यूज मराठी' विरुध्द तक्रार दाखल
संगमनेर LIVE (शिर्डी) | सोशल मीडियावर श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालय आणि लाडू निर्मिती विभागाबाबत पसरवण्यात आलेली बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले आहे. संस्थानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या "24 News Marathi Official" या इन्स्टाग्राम अकाऊंटविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर एका बातमीद्वारे असा दावा करण्यात आला होता की, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शिर्डीतील लाडू निर्मिती केंद्र आणि प्रसादालय सील केले आहे. मात्र, संस्थानने या दाव्याचे पूर्णपणे खंडन केले असून, ही माहिती अत्यंत निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. श्री साईबाबा संस्थानचा साई प्रसादालय, लाडू आणि बर्फी निर्मिती विभाग हे अन्न सुरक्षा आणि आरोग्य विषयक सर्व आवश्यक मानकांचे काटेकोरपणे पालन करून नियमितपणे कार्यरत आहेत.
या विभागांतील लाडू आणि बुंदी प्रसादाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी संस्थानची स्वतःची प्रयोगशाळा कार्यरत असून, अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचेही काटेकोर पालन केले जाते. साई प्रसादालयात दररोज हजारो भाविकांना मोफत प्रसाद भोजन देण्याचे पवित्र कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे.
संस्थान प्रशासनाने सर्व साई भक्तांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही अप्रमाणित किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. संस्थानशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी केवळ संस्थानच्या अधिकृत माध्यमांचाच वापर करावा.
दरम्यान, चुकीच्या माहितीमुळे साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची आणि संस्थानच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याने, ही अफवा पसरवणाऱ्या संबंधित व्यक्तीवर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.