“अध्यात्म हे केवळ अनुकरणाचे साधन नसून आचरणाचे तत्त्व” - नंदकुमार पोवार
◻️ गुंजाळवाडीत सप्ताहनिमित्ताने व्याख्यानातून विचारांचा जागर
संगमनेर LIVE | अध्यात्म सांगणे सोपे असते, परंतु ते प्रत्यक्ष आचरणात आणून जगणे अत्यंत कठीण असते. मानवी जीवन हे अध्यात्माशिवाय अपूर्ण आहे, ज्याप्रमाणे मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसे अध्यात्म हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अध्यात्माला बदनाम करू नका, असे मार्मिक मार्गदर्शन ज्येष्ठ व्याख्याते नंदकुमार पोवार (गगनबावडा) यांनी केले.
तालुक्यातील गुंजाळवाडी येथे प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्येचा, त्यागाचा आणि लोककल्याणकारी कार्याचा भावपूर्ण वेध घेत उपस्थित भाविकांना अध्यात्माची नवी दिशा दाखवली.
पोवार पुढे म्हणाले की, गगनगिरी महाराज हे जन्मजात ईश्वरी अवतारातील योगी होते. त्यांनी आयुष्यभर ऊन, वारा, पाऊस झेलत अत्यंत कठोर साधना केली. वन्य प्राणी आणि श्वापदांनाही त्यांनी आपुलकीने सांभाळले. महाराजांनी लोकांंतातून एकांताचा मार्ग स्वीकारून आत्मसाधना केली, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारे संत ठरले. त्यांच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक आत्मा पावन होतो, असेही त्यांनी नमूद केले.
नगर जिल्ह्यात भक्तीचे बीज रोवून हरिनामाचा जागर घडविण्याचे कार्य गगनगिरी महाराजांच्या कृपेने होत आहे. हा सप्ताह सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो समाजप्रबोधनाचा आणि अध्यात्मिक उन्नतीचा एक ईश्वरी मेळावा असल्याचे पोवार त्यांनी सांगितले.
व्याख्यानानंतर जयवंत महाराज पाटील (राधानगरी) यांचे कीर्तन झाले. सप्ताहाच्या निमित्ताने सकाळी आठ ते अकरा या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, तर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. या सप्ताह सोहळ्याला परिसरातील भाविक मोठी गर्दी करत आहेत.
दरम्यान, सप्ताहाच्या महाप्रसादासाठी ओझर खुर्द ग्रामस्थांनी १०१ क्विंटल साखर, ५१ क्विंटल तांदूळ असे एकूण १५१ क्विंटल तसेच भाकरी-आमटी प्रसादाचे उदार योगदान देत आपल्या श्रध्दा व भक्तीचा अनोखा परिचय दिला.