स्वामी गगनगिरी महाराज हे आमचे राम आहेत - ढोक महाराज

संगमनेर Live
0
स्वामी गगनगिरी महाराज हे आमचे राम आहेत - ढोक महाराज

◻️रामकथेच्या पाचव्या पुष्पात भक्तिरसात न्हाऊन निघाली गुंजाळवाडी!

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या सुश्राव्य आणि भावस्पर्शी वाणीतून सादर होत असलेल्या रामकथेमुळे भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. रामकथेच्या माध्यमातून त्यांनी भक्ती, त्याग आणि सेवा यांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला.

रामकथेतील विविध प्रसंगांचे निरूपण करताना ढोक महाराजांनी शबरीच्या निस्वार्थ भक्तीवर प्रकाश टाकला. शबरीकडे बाह्य वैभव नव्हते, मात्र तिच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्रांबद्दल असलेली निष्ठा आणि मातृत्व हीच तिची खरी श्रीमंती होती, असे त्यांनी सांगितले. तसेच, संपाती आणि जटायू यांचा त्याग आणि रामनामाच्या सामर्थ्यामुळे संपातीच्या जीवनात झालेले परिवर्तन यावर भाष्य करत, रामकृपा हीच खरी नवसंजीवनी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या रामकथेच्या सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार अमोल खताळ यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ढोक महाराजांनी विखे पाटील परिवाराच्या चार पिढ्यांनी जोपासलेल्या समाजसेवेच्या परंपरेचे भरभरून कौतुक केले. विखे पाटील हे केवळ राजकीय घराणे नसून, महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचे ‘काळजीवाहू संचित’ असल्याचे सांगत महाराजांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोकभिमुख नेतृत्वाचा गौरव केला.

या प्रसंगी बोलताना दिलीप शिंदे म्हणाले की, समाजात धर्मनिष्ठा आणि संस्कार टिकवून ठेवण्यासाठी साधूसंत, लोकसत्ता आणि शासन यांचा समन्वय आवश्यक आहे. जर संतांचे मार्गदर्शन आणि शासनाची सकारात्मक इच्छाशक्ती एकत्र आली, तर भारत आध्यात्मिक वैभवाने समृध्द असे ‘कैवल्यधाम’ बनेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !