संतसंग आणि ईश्‍वरनिष्ठाच जीवनाचा खरा मार्ग - रामायणाचार्य ढोक महाराज

संगमनेर Live
0
संतसंग आणि ईश्‍वरनिष्ठाच जीवनाचा खरा मार्ग - रामायणाचार्य ढोक महाराज

◻️ रामकथेच्या तिसऱ्या पुष्पात सीता स्वयंवरासाठी प्रत्यक्ष जनकपुरीत असल्याचा भाविकांना झाला भास

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात सध्या भक्तीचा अखंड प्रवाह वाहत असून, अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित श्रीराम कथामालेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या रसाळ आणि ओजस्वी वाणीतून सादर झालेली सीता स्वयंवर कथा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. महाराजांच्या सादरीकरणामुळे उपस्थित हजारो भाविकांना आपण प्रत्यक्ष जनकपुरीतील स्वयंवर मंडपातच आहोत, असा भास झाला.

​कथेला प्रारंभ करताना महाराजांनी अहिल्येच्या उध्दाराचा प्रसंग सांगून ईश्‍वरकृपेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर विश्‍वामित्र ऋषींच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जनकपुरीत पोहोचल्याचे वर्णन आणि पुढे घडलेला सीता स्वयंवराचा थरारक प्रसंग त्यांनी अतिशय भावस्पर्शी शैलीत मांडला. शिवधनुष्याचे वर्णन करताना महाराजांनी दिलेल्या शब्दांकनामुळे उपस्थित भाविक रोमांचित झाले. जेव्हा प्रभू श्रीरामांनी धनुष्याला स्पर्श केला, तेव्हाचा तो क्षण आणि त्यानंतरचा धनुष्यभंग यामुळे उपस्थित भक्तांनी “जय श्रीराम” च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.

​महाराजांनी आपल्या प्रवचनातून उपस्थितांना अंतर्मुख केले. ते म्हणाले की, “आजचा माणूस भौतिक सुखांच्या मागे धावत असला तरी खरे समाधान हे ईश्‍वरनिष्ठा, सदाचार आणि संतसंगातच आहे.” रामायणातील पात्रांमधून त्यांनी जीवनमूल्ये उलगडून दाखवली, ज्यामुळे उपस्थितांना धर्माचरणाची एक नवी दिशा मिळाली.

​गुंजाळवाडी येथील शंभर एकरांच्या विस्तीर्ण परिसरात आयोजित या सप्ताहाचे नियोजन डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. याठिकाणी केवळ कथाच नाही, तर शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण असे कृषि प्रदर्शन, खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स आणि लहान मुलांसाठी खेळण्याची सोय करण्यात आली आहे. हजारो भाविकांची एकाच वेळी पंगत बसेल अशी भव्य भोजन व्यवस्था, जप मंडप आणि यज्ञ मंडप अशा सर्वच पातळ्यांवर केलेले शिस्तबध्द व भव्य नियोजन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

दरम्यान, गगनगिरी महाराज भक्तगण परिवार आणि समितीने केलेल्या या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत असून, हा सप्ताह भाविकांसाठी भक्तीचे आणि मार्गदर्शनाचे मोठे व्यासपीठ ठरत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !