श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेरमध्ये आगमन
◻️ वारकरी संप्रदाय ही समतेची शक्ती - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | रिमझिम पाऊस, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठूनामाचा जयघोष करत, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आगमन झाले. या पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे आगमन होताच, वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे भक्तीभावाने उत्साहात स्वागत केले.
त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या या वारीत सुमारे वीस हजार वारकरी सहभागी झाले आहेत. पावसाची हजेरी आणि निसर्गरम्य वातावरणामुळे वातावरणात एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा जाणवत होती. स्वागताच्या कमानी, लेझीम पथके आणि विद्यार्थ्यांच्या पारंपारिक वेशभूषेने पारेगाव बुद्रुक परिसर अक्षरशः नटला होता.
कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, डॉ. कुणाल सोनवणे, बी. आर. चकोर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, संपतराव गोडगे, डॉ. दत्तात्रय गडाख, ॲड. त्रंबक गडाख, दौलतराव गडाख, सोमनाथ गडाख, दिंडीचे माधव महाराज राठी आदी यावेळी वारीत सहभागी झाले होते.
पालखीचे स्वागत करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणणारा आहे. वारी ही आनंदवारी असून, ती जागतिक शांततेचे प्रतीक आहे.” यावेळी त्यांनी राज्यावर ओढवलेल्या दुष्काळाच्या सावटाचे निवारण व्हावे आणि सर्वत्र चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे आणि डॉ. जयश्री थोरात यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दरम्यान, याप्रसंगी बाळासाहेब थोरात आणि डॉ. जयश्री थोरात यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत आणि अभंग गात भक्तीचा आनंद घेतला.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने मागील अनेक वर्षांप्रमाणे यावर्षीही वारकऱ्यांसाठी व्यापक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टॅकर, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून २५ डॉक्टरांचे पथक व नर्सची वैद्यकीय सेवा, तसेच वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व गावांमधून वारकऱ्यांचे स्वागत आणि त्यांना आवश्यक सुविधा देण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून, या मदतीबद्दल वारकरी बांधवांनी समाधान व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.