गरीबांना वेठीस धरून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही - आमदार अमोल खताळ
◻️ नगरपालिका प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारावर व्यक्त केली नाराजी
संगमनेर LIVE | संगमनेर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शहराचा विकास करताना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचाही विचार करणे आवश्यक असून, गरीबांना वेठीस धरून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही किंवा शहराचा विकास साधता येणार नाही, असे मत आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
आमदार खताळ म्हणाले की, हातावर पोट असलेले अनेक नागरिक छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा नागरिकांवर अचानक अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधितांना त्यांचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी पुरेसा वेळ देणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र कोणतीही पुरेशी मुदत न देता थेट कारवाई करण्यात आल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडविणे आवश्यक असले, तरी त्यासाठी मानवी दृष्टिकोन ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना गरीब व सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घेतली पाहिजे. अतिक्रमण हटविण्यापूर्वी संबंधितांना लेखी सूचना देणे, साहित्य हलविण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून देणे तसेच आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे होते, असेही त्यांनी नमूद केले.
संगमनेर शहराचा विकास हा सर्व घटकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या हिताचा विचार करूनच झाला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहावर गदा आणून विकास साधणे योग्य ठरणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांमध्ये प्रशासनाने अधिक संवेदनशीलता, योग्य नियोजन आणि मानवी मूल्यांचा विचार करून निर्णय घ्यावेत. असे आवाहन देखील आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.