संगमनेर शहरातील सुप्रसिध्द हॉस्पिटलचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या गळाला

संगमनेर Live
0
संगमनेर शहरातील सुप्रसिध्द हॉस्पिटलचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या गळाला

◻️ महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी २० हजारांची मागणी 

संगमनेर LIVE | गरजू रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चा लाभ मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका सुप्रसिध्द हॉस्पिटलच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे संगमनेर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईच्या ऑपरेशनसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची गरज होती. मात्र, या सुप्रसिध्द हॉस्पिटलमधील डेटा एन्ट्री ऑपरेटर असलेल्या कर्मचाऱ्यांने या उपचारासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली. इतकेच नाही तर, “हे पैसे दिल्यावर याचे बिल मिळणार नाही,” अशी अटही त्याने घातली.

​तक्रारदाराने हॉस्पिटलचे ऑपरेशन मॅनेजर असलेल्या व्यक्तींकडे याबद्दल विचारणा केली असता, “जे ठरले आहे त्यात काहीही कमी होणार नाही,” असे म्हणत त्यानें देखील डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या लाचखोरीला प्रोत्साहन दिले. या प्रकारामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, पोलीस निरीक्षक छाया देवरे आणि त्यांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये सापळा रचला. लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि हॉस्पिटलचे ऑपरेशन मॅनेजर असलेल्या दोन्ही आरोपींविरुदध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ (अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे यातील एक जण शहरातील दुसरा मूळ आश्‍वी परिसरातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

​ही धाडसी कारवाई नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे आणि त्यांच्या पथकातील गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर यांनी केली.

दरम्यान, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या या वृत्तीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे आता शहरातील इतर हॉस्पिटल्समध्येही अशा प्रकारे अडवणूक होते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील जोर धररण्याची आता शक्यता आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !