किसान सभेच्या मागण्या सरकारकडून मान्य - डॉ. अजित नवले

संगमनेर Live
0
किसान सभेच्या मागण्या सरकारकडून मान्य - डॉ. अजित नवले 

◻️ नियमित कर्जदारांना २ लाखांपर्यंत दिलासा; देवस्थान आणि गायरान जमिनींबाबत सकारात्मक निर्णय

संगमनेर LIVE (​मुंबई) | ​आझाद मैदानावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य आणि धडक मोर्चाची दखल अखेर राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. शेतकरी आंदोलनाच्या प्रचंड दबावानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य सरकार आणि किसान सभेच्या प्रतिनिधींमध्ये एक महत्त्वपूर्ण व उच्चस्तरीय बैठक पार पडली. 

महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सविस्तर चर्चेत शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे किसान सभेने काढलेला हा मोर्चा अत्यंत यशस्वी ठरल्याची अधिकृत घोषणा किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

​या उच्चस्तरीय बैठकीत शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि जमिनीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला. कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी त्यांना २ लाख रुपयांपर्यंत ‘रिलीफ' किंवा दिलासा देण्याची किसान सभेची आक्रमक मागणी कृषी मंत्र्यांनी मान्य केली आहे. हा प्रस्ताव तात्काळ कर्जमाफी उपसमितीत आणि मुख्यमंत्र्यांसमोर ठेवून नियमित कर्जदारांना न्याय देण्याचे ठोस आश्‍वासन यावेळी देण्यात आले.

​तसेच देवस्थान जमिनी, गायरान जमिनी आणि घरांच्या तळजमिनीबाबत महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत अत्यंत सकारात्मक निर्णय झाले आहेत. देवस्थान जमिनीसंदर्भातील नव्या कायद्याच्या प्रक्रियेत किसान सभेचे २ आणि गुरव समाज संघटनेचे २ असे एकूण ४ निमंत्रित प्रतिनिधी समाविष्ट करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शेतजमिनीवरून बेकायदेशीरपणे हुसकावून लावलेल्या कसणाऱ्या कुळ शेतकऱ्यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळून न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

​याशिवाय शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करणारे पीक विम्याचे नवे जाचक नियम रद्द करून जुने ट्रिगर निकष पुन्हा लागू करण्यावर उभय पक्षात सहमती झाली आहे. सोबतच राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे सरकारने मान्य केले असून, सेवेतून अन्यायकारकरीत्या काढून टाकण्यात आलेल्या सर्व 'पेसा' कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याबाबतही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

​बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. अजित नवले यांनी आंदोलनाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. आझाद मैदानावरील शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला मागण्यांची गंभीर दखल घेणे भाग पडले असल्याचे सांगत ते म्हणाले की, “राज्य सरकारने मान्य केलेल्या सर्व मागण्यांची तातडीने आणि योग्य पध्दतीने अंमलबजावणी करावी. सरकारने योग्य अंमलबजावणी केल्यास किसान सभा त्याचे स्वागत करेल; मात्र सरकारने शब्द फिरवल्यास शेतकरी पूर्णपणे जागे आहेत आणि आंदोलनाचा मार्ग आमच्यासाठी नेहमीच खुला राहील.” असा इशारा देखील दिला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !