दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक - प्रभावती घोगरे

संगमनेर Live
0
दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक - प्रभावती घोगरे

◻️ दूध भेसळ माफियांची पाठराखण करण्याची भूमिका दुर्दैवी

संगमनेर LIVE (​राहाता) | दूध भेसळ करणाऱ्यांवर सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईला विरोध करून काही घटकांकडून भेसळ माफियांची पाठराखण केली जात असल्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. प्रामाणिक शेतकरी, दूध उत्पादक आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची चिंता करणाऱ्यांनी आपल्या भूमिकेचा तातडीने पुनर्विचार करावा, असा सल्ला कॉग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांनी दिला आहे.

​काही जणांकडून असा अपप्रचार केला जात आहे की कारवाईमुळे सर्व दूध संकलन केंद्रे बंद पडतील. यावर स्पष्टीकरण देताना घोगरे म्हणाल्या की, ही कारवाई केवळ नियमांचे उल्लंघन करणारे आणि कृत्रिमरीत्या दुधाचा पुरवठा वाढवून बाजारात दर पाडणाऱ्या भेसळखोरांवर आहे. त्यामुळे कुठल्याही प्रामाणिक दूध उत्पादक किंवा दूध संकलन केंद्राने भेदरून जाण्याचे कारण नाही. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांनाच या भेसळधंद्यामुळे आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

​दूध भेसळ हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून, थेट सर्वसामान्य नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी निगडीत अत्यंत गंभीर स्वरूपाचा अपराध आहे. अशा धाडसी आणि कायदेशीर कारवाईचे स्वागत होणे अपेक्षित असताना काही जणांकडून आरोपींना पाठीशी घातले जात आहे, हे निंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

​कर्तव्यदक्ष अधिकारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर विनाकारण टीका करणे आणि चुकीच्या प्रवृत्तींना बळ देणे चुकीचे आहे. समाजहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व आणि गुन्हेगारांना अभय देणारी मानसिकता यातील भेद जनता ओळखून आहे.

​सध्या शेतकरी विविध आर्थिक संकटांचा सामना करत आहे. अन्नदात्याला त्याच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा, ग्राहकांना शुध्द व पौष्टिक दूध उपलब्ध व्हावे आणि बाजारात प्रामाणिकपणाचे वातावरण टिकून राहावे, यासाठी भेसळ माफियांच्या विरोधात सुरू असलेली कठोर मोहीम अशीच अविरत सुरू राहिली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी शेवटी व्यक्त केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !