दिल्ली येथील आंदोलनावरुन बाळासाहेब थोरातांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

संगमनेर Live
0
दिल्ली येथील आंदोलनावरुन बाळासाहेब थोरातांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

◻️ “विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे लोकशाहीसाठी घातक; लाठी हल्ल्याचा केला निषेध”

​संगमनेर LIVE | देशातील आदर्श व्यक्तिमत्व आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांचे दिल्लीत सुरू असलेले २१ दिवसांचे उपोषण हा विद्यार्थी व सर्वसामान्यांचा आवाज आहे. मात्र, हा आवाज ऐकू न घेणाऱ्या केंद्र सरकारच्या वागण्यात सत्तेचा दर्प दिसत असून, हाच तरुण वर्ग सरकारला आगामी काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठी हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

​नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सोनम वांगचुक जंतर-मंतरवर २१ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेले वांगचुक यांच्याशी सरकारने समन्वय साधायला हवा होता. मात्र, एक महिना उलटत आला तरी सरकारच्या एकाही प्रतिनिधीने त्यांची दखल घेतली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून, कष्टकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वेदनांचा उद्रेक आहे.

​इंग्रजांच्या राजवटीतही आंदोलकांशी संवाद साधला जात होता, असे सांगत थोरात यांनी इंदिरा गांधींच्या काळाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “सोनम वांगचुक यांचे वडील यांनी लडाखमध्ये उपोषण केले होते, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः जाऊन त्यांचे उपोषण सोडवले होते. मात्र, आजच्या सरकारला जनतेच्या भावनांशी काहीही देणेघेणे उरले नाही.” अशी खंत व्यक्त केली.

​देशात सर्वत्र अनागोंदी आणि अशांतता पसरली असून कॉग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. खासदार राहुल गांधींनी संसदेपासून ते देशभरात विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरले आहेत. राज्यघटना व लोकशाही टिकवण्यासाठी आता सुजाण नागरिकांनी पुढे येण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, सध्या सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेत प्रत्येकाने आपली नावे नोंदवून लोकशाहीचा पाया बळकट करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

दरम्यान, विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातील कॉग्रेस पक्ष आणि विविध पुरोगामी व विद्यार्थी संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

बाळासाहेब थोरात व सोनम वांगचुक यांची भेट

सोनम वांगचुक हे प्रसिध्द शिक्षणतज्ञ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत. हिमालयातील जलसंधारणात त्यांनी मोठे कार्य केले आहे. यापूर्वी, साधारण सहा महिन्यांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी लडाख येथे जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि शिक्षण व्यवस्थेवर सविस्तर चर्चा केली होती.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !