विकासकामांच्या गुणवत्तेशी तडजोड खपवून घेणार नाही - आमदार अमोल खताळ
◻️ रस्ते दुरुस्ती आणि अतिक्रमणांबाबत बांधकाम विभागाला निर्देश
संगमनेर LIVE | महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार झाल्यानंतर संगमनेर मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला असून, मंजूर कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी (दि. १७) दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंजे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, सहाय्यक अभियंता संजय टेकाळे यांच्यासह उपअभियंते यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाचा निधी हा जनतेच्या हितासाठी असून, प्रत्येक विकासकाम निर्धारित निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे. कामात हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही.
कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या पावसाळ्यामुळे काही अडचणी असल्या तरी त्या तातडीने दूर करून रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्तीची कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्या ठेकेदारांच्या कामांचा दुरुस्ती कालावधी अद्याप शिल्लक असूनही ते रस्त्यांची दुरुस्ती करत नाहीत, अशा ठेकेदारांवरही नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
संगमनेर शहरातील अकोले नाक्यावरील शारदा विद्यालयाजवळील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. तसेच राज्यमार्ग व इतर सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे नियमानुसार हटवावीत. मात्र, अतिक्रमण हटविताना विनाकारण कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वाहतुकीस अडथळा ठरणारी व अपघातास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले.