कोणाच्याही दबावाखाली न येता मतदार याद्यांचे काम कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने करावे

संगमनेर Live
0
कोणाच्याही दबावाखाली न येता मतदार याद्यांचे काम कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने करावे

◻️ पालकमंत्री विखे पाटलांच्या पाच ते सहा गावांचे मिळून शिबिर घेण्याच्या सूचना

संगमनेर LIVE | मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण अतिशय गंभीर्याने होणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणेतील नियुक्त कर्मचाऱ्यांनी एकाच ठिकाणी बसून काम करू नये. कोणाच्या दबावाखाली येऊन काम होत असेल तर प्रांताधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी. उर्वरित कालावधीत काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाच ते सहा गावे मिळून शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेच्या कामाचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी बैठकीच्या माध्यमातून घेतला. आमदार अमोल खताळ, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रदीप सिनारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी बैठकीच्या माध्यमातून एसआयआर मोहीम राबविताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. बहुतांशी गावांत शासनाने नेमलेले बीएलओ आणि पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. याबाबत पालकमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेत शासनाच्या प्रतिनिधींनी एकाच ठिकाणी बसून काम करू नये, असे प्रकार होत असतील तर, प्रांताधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशा सूचना दिल्या. शहरात शासनाचे प्रतिनिधी नगरसेवकांच्या दबावात येऊन काम करीत असल्याच्या तक्रारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केल्या. पालिकेच्या माध्यमातून मागील काही महिन्यांत मोठ्या संख्येने जन्माचे दाखले देण्यात आल्याची बाब उपस्थितांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

विधानसभा मतदारसंघात ५५ ते ६० टक्के काम झाल्याने कामाचा वेग वाढवावा लागेल असे सांगून, मंत्री विखे पाटील यांनी ग्रामीण भागात ५ ते ६ गावे मिळून कॅम्प लावून एकत्रितपणे कामाला गती द्यावी. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर मतदारांशी थेट संपर्क साधून याबाबत नियोजन करून काम करावे. मतदार याद्यांमधील दुरुस्ती ही भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीचे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यामुळेच या मोहिमेकडे दुर्लक्ष करू नका, त्याचे महत्त्व आताच ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून एसआयआर मोहिमेचे काम कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सुरू असले तरी, यामध्ये अधिक गती देण्यासाठी पुढच्या काही दिवसांत व्यक्तिगत लक्ष घालणार असून, महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, प्रभागात थांबून मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रांताधिकारी अरूण उंडे यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !