गणेश साखर कारखान्याची निवडणूक लढवणार नाही - डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर Live
0
गणेश साखर कारखान्याची निवडणूक लढवणार नाही - डॉ. सुजय विखे पाटील 

◻️ पण, सभासदांच्या हिताचा न्यायालयीन लढा सुरूच राहणार

संगमनेर LIVE (​शिर्डी) | गणेश सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. राहाता येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपण किंवा आपले कार्यकर्ते गणेश कारखान्याची निवडणूक लढवणार नसल्याची स्पष्ट घोषणा केली.

निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर करतानाच डॉ. विखे यांनी स्पष्ट केले की, "हा कारखाना तुमचाच आहे. आमची लढाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात किंवा संस्था बंद पाडण्यासाठी नाही. प्रवरा कारखान्याच्या सभासदांच्या हक्काचे पैसे हे राधाकृष्ण विखे पाटील किंवा माझ्या मालकीचे नाहीत, ते सभासदांचेच आहेत. त्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी आमची न्यायालयीन लढाई सुरूच राहील.” असे त्यांनी स्पष्ट केले.

ऊस पुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, “शेतकरी आपला ऊस कोणाला द्यायचा, हा निर्णय त्यांचा आहे. आम्ही जेव्हा गणेश कारखाना चालवत होतो, तेव्हा इतरांनी आमचा ऊस पळविला होता. मग आता आमचे कार्यकर्ते त्यांच्या इच्छेनुसार ऊस देत असतील, तर त्याला विरोध का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “विरोधकांच्या भाषणांवर वेळ घालवण्यापेक्षा विकासावर चर्चा करा. पुढील दोन वर्षांत राहाता शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल. आमचा भर केवळ विकासकामांवरच राहणार आहे.” अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाजपच्या संघटन शक्तीवर विश्‍वास व्यक्त करत डॉ. विखे यांनी कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचा सल्ला दिला. “जोपर्यंत कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, तोपर्यंत भाजप आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वाला कोणताही धक्का लागू शकत नाही. त्यामुळे टीका करण्यापेक्षा विकासाच्या कामात स्वतःला झोकून द्या,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

दरम्यान, ​या कार्यक्रमाला राहाता व गणेश परिसरातील भाजपचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !