स्वातंत्र्यदिनी कॅनरा बॅकेंकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान!
◻️ देवगाव येथील ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट मदत जमा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संगमनेर येथील कॅनरा बॅक शाखेने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांनी देवगाव (ता. संगमनेर) येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वी मधील मागासवर्गीय प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्या ज्योती शिष्यवृत्ती’ प्रदान केली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन कॅनरा बॅकेचे सहाय्यक व्यवस्थापक हर्षल ठाकरे, बॅक कर्मचारी समीर फाफाळे व विजय कासार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी बॅक अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह पासबुक सुपूर्द करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक प्रगतीला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी या उपक्रमांतर्गत विविध इयत्तांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यामध्ये इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी आरोही सुरेश रोहम, ६ वीची श्रध्दा गौतम पवार आणि ७ वीची ऋतुजा नितीन ठोंबरे या तिघींना प्रत्येकी ३ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच इयत्ता ८ वीतील दिव्या गोरख पवार, ९ वीतील शीतल गोवर्धन माळी आणि १० वीतील नयन विनोद पवार या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ही संपूर्ण रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालयातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी तुषार पानसरे यांनी कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधून विशेष सहकार्य केले. त्यांच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देणारा कॅनरा बँकेचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचे मत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी कॅनरा बँक प्रशासन आणि तुषार पानसरे यांचे आभार मानले आहेत.