अश्वी इंग्लिश स्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून २.५ लाखांचा वॉटर प्युरिफायर भेट
◻️ स्वर्गीय सूर्यकांत भंडारी यांच्या स्मरणार्थ भंडारी बंधूंचा स्तुत्य उपक्रम
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी येथील ‘अश्वी इंग्लिश स्कूल'मध्ये माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा वस्तुपाठ घालून दिला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांनी सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर प्लांट शाळेला भेट दिला.
माजी विद्यार्थी राहुल भंडारी, रोहित भंडारी व रविंद्र भंडारी यांनी आपले वडील स्वर्गीय सूर्यकांत देवीचंद भंडारी यांच्या पवित्र स्मरणार्थ हा उपक्रम राबविला आहे. ताशी ५०० लिटर पाणी शुध्द करण्याची क्षमता असलेल्या या अत्याधुनिक प्रकल्पाचे लोकार्पण इंदुमती भंडारी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. केवळ प्रकल्प उभारून न थांबता, या वॉटर प्युरिफायर प्लांटच्या लाईफटाईम मेंटेनन्स (आजीवन देखभाल) चा संपूर्ण खर्चही भंडारी बंधूंनी स्वतः स्वीकारून आपल्या सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.
दरम्यान, विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी झोपण्याकरिता पलंगांची अत्यंत गरज असल्याचे आवाहन प्रभारी प्राचार्य दिपक चव्हाण यांनी केले होते. या सामाजिक आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत सुमतीलाल गांधी यांनी पलंगांच्या खरेदीसाठी १० हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक बालोटे, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच बाळासाहेब मदने, पर्यवेक्षक रमेश थेटे, ज्येष्ठ पत्रकार सीताराम चांडे, योगेश रातडीया, वैभव ताजणे, प्रशांत गांधी, सुभाष म्हसे, गणेश गायकवाड, सतीश होडगर, संतोष ताजणे, सुशील भंडारी, सेवानिवृत्त प्राचार्य राजू शहाणे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या पुढाकाराबद्दल आश्वी परिसर व शैक्षणिक वर्तुळातून भंडारी बंधूंचे अभिनंदन होत आहे.