शिर्डीत श्री साईबाबा संस्थानतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
◻️ सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; दिल्ली उच्च न्यायालयाचे मानले आभार
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थानच्या शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर सकाळी ठीक ८.१५ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, संदीपकुमार भोसले, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वऱ्हाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांच्यासह संस्थानचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या महान त्यागाचे स्मरण केले. संस्थानच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण आणि आवश्यक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थानतर्फे लवकरच विविध नवे उपक्रम राबवले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा गाडीलकर यांनी या वेळी केली.
आपल्या भाषणात गाडीलकर यांनी श्री साईबाबांविषयी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधात संस्थानला मिळालेल्या मोठ्या कायदेशीर यशाची माहिती दिली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्देशानंतर जीएसी कडून संबंधित सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लेख २४ तासांच्या आत हटवण्याचे कठोर आदेश जारी करण्यात आले आहेत. संस्थानची बाजू न्यायालयात खंबीरपणे मांडून हा विजय मिळवून दिल्याबद्दल गाडीलकर यांनी दिल्ली उच्च न्यायालय, ज्येष्ठ वकील प्रमोद कुमार दुबे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे संस्थानच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोकेगांवकर आणि विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन कन्या विद्या मंदिरचे उपाध्यापक वसंत वाणी आणि क्रीडा शिक्षक राजेन्द्र कोहकडे यांनी केले.