पालकमंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली गुंतवणूक परिषदेचे आयोजन
◻️ अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासाला नवे पंख; रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीवर भर
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय व गुंतवणुकीला मोठी चालना देऊन स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर यांच्या वतीने ‘डिस्ट्रीक्ट इन्व्हेस्टमेंट समिट २०२६’ (जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६) चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह (दुसरा मजला) येथे पार पडणार आहे.
या परिषदेचे अध्यक्षस्थान जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे) तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील भूषविणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेची आखणी करण्यात आली असून, या प्रसंगी 'मैत्री'चे विशेष आयुक्त वैभव वाघमारे तसेच अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योग व गुंतवणुकीच्या अथांग संधींचा व्यापक प्रसार करून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार व उद्योजकांना अहिल्यानगरकडे आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात अधिकाधिक गुंतवणूक आल्यास नवीन मोठ्या तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची स्थापना होईल. यामुळे स्थानिक पातळीवर तरुणांसाठी रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होण्यासोबतच स्थानिक पुरवठादार व सेवा क्षेत्रातील पूरक व्यवसायांना मोठी बळकाटी मिळणार आहे. याशिवाय, स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी बाजारपेठ मिळून जिल्ह्याच्या एकंदरीत आर्थिक विकासाला तीव्र गती मिळेल.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या अधिक समृध्द व सक्षम बनवण्यासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रातील सर्व भागधारक, नवउद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांनी शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात उपस्थित राहून उपलब्ध संधींची सविस्तर माहिती घ्यावी आणि जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत आपले सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उपआयुक्त दीपक शिवदास आणि उद्योग विभाग (नाशिक विभाग) च्या सहआयुक्त वृषाली सोने यांनी केले आहे.