पिप्रीं येथे दिवसाढवळ्या कुत्र्यांच्या प्राणघातक हल्ल्यात चार कोकर आणि एक मेंढी ठार

संगमनेर Live
0

                             **AI फोटो**

पिप्रीं शिवारात दिवसाढवळ्या कुत्र्यांच्या प्राणघातक हल्ल्यात चार कोकर आणि एक मेंढी ठार  
  
◻️ एकीकडे रानडुकरांकडून पिकांची नासधूस, तर दुसरीकडे मोकाट कुत्र्यांची दहशत


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ​निसर्गाच्या लहरीपणाचा आणि अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजावर आता मोकाट कुत्र्यांचे देखील संकट ओढवले आहे. पिंप्री-लौकी अजमपूर (ता. संगमनेर) शिवारात गुरुवारी (दि. २०) भर दिवसा १० ते १२ हिंस्र कुत्र्यांच्या टोळक्याने रानात चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चार कोकराचा आणि एका मेंढीचा मृत्यू झाला असून, दोन मेंढ्या आणि एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. आधीच रानडुकरांच्या उपद्रवाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आता या मोकाट कुत्र्यांंमुळे दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेंढपाळ शेतकरी पोपट दातीर यांच्या कुटुंबातील महिला सदस्या या गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रानात आपल्या मेंढ्या आणि शेळ्या चारत होते. सर्वत्र शांतता असताना अचानक १० ते १२ हिंस्र आणि मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने लांडग्यांसारखा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्याने कळपात एकच हाहाकार उडाला. कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडत चार कोकर आणि एका मेंढीचा बळी घेतला. तर दोन मोठ्या मेंढ्या आणि एक शेळी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. इतर मेंढ्यानाही या कुत्र्यांनी चावा घेतल्याची भीती दातीर यांनी व्यक्त केली आहे.

​घटनेची माहिती मिळताच आश्‍वी खुर्द येथील पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश नागरगोजे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी मेंढ्या आणि शेळीवर प्राथमिक औषधोपचार केले. मात्र, या मुक्या जनावरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे पोपटराव दातीर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

परिसरात आधीच बिबट्याची मोठी दहशत आहे. त्यातच आता बाहेरून आणून सोडलेल्या या मोकाट कुत्र्यांमुळे भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. हे १० ते १५ कुत्र्यांचे टोळके गावात आणि शिवारात फिरत असते. आज त्यांनी मुक्या जनावरांचा बळी घेतला, उद्या ते शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर किंवा शेतात काम करणाऱ्या एकट्या-दुकट्या माणसावर हल्ला करणार नाहीत कशावरून? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

एकीकडे जनावरांवर हल्ले होत असताना, दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांची रानडुकरांकडून राजरोसपणे नासधूस सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून पानोडी रोड ते दरा भागात तसेच पिंप्री फाटा ते गीते वस्ती या परिसरात रानडुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले ऊस आणि मक्याचे पीक रानडुकरे एका रात्रीत भुईसपाट करत आहेत. ​वन विभाग मात्र, इकडे दुर्लक्ष करत असल्याचां गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, प्रशासनाने रानडुकरे आणि मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भारत गिते, प्रशासक तथा सरपंच सौ. संगीता गीते आणि उपसरपंच बाजीराव गीते यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !