संगमनेरमधील बांधकाम कामगारांच्या बॅक खात्यात १० कोटी १६ लाख रुपये जमा!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; ८ हजार ५९५ कामगारांचे प्रस्ताव मंजूर
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत संगमनेर तालुक्यातील तब्बल ८ हजार ५९५ बांधकाम कामगारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १० कोटी १६ लाख ७३ हजार २८० रुपये एवढी मोठी रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे. ऐन वेळी मिळालेल्या या आर्थिक आधारामुळे कामगार वर्गात मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कामगारांची नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता आणि प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात आला. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत, सामाजिक सुरक्षा आणि कुटुंबाच्या गरजांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रशासनाच्या गतीमान कार्यवाहीमुळे हजारो कामगारांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा झाली आहे.
पात्र बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी नोंदणीपासून ते लाभाची रक्कम खात्यावर जमा होईपर्यंतच्या प्रक्रियेत कामगारांना आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विशेष मदत केली जात आहे. अधिकाधिक कामगारांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्यांना लाभ मिळवून दिला जात असल्याने बांधकाम कामगारांनी आमदार खताळ यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच, उर्वरित पात्र कामगारांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“बांधकाम कामगार हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हात, पावसात आणि प्रतिकूल परिस्थितीत मेहनत करून ते शहरांसह ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान देतात. त्यांच्या कष्टाला शासनाच्या कल्याणकारी योजनांची साथ मिळणे आवश्यक आहे. तालुक्यातील एकही पात्र बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. मंजूर झालेले ८ हजार ५९५ प्रस्ताव आणि वाटप झालेले १० कोटींहून अधिक रुपये ही केवळ आकडेवारी नसून, हजारो कामगार कुटुंबांना मिळालेला तो मोठा आर्थिक आधार आहे. भविष्यातही पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.