गंगागिरी महाराज सप्ताहात आमदार खताळ आणि आमदार लंघे झाले सहभागी
◻️ महाप्रसादाचा भाविकासमवेत पंगतीत बसून घेतला आस्वाद
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | गंगागिरी महाराज सप्ताहात आमदार अमोल खताळ आणि नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी थेट भाविकांच्या पंगतीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात या दोन्ही आमदारांचा हा साधेपणा भाविकांची मने जिंकून गेला.
धनगरवाडी येथे सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्साह असून, या ठिकाणी राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि मान्यवर हजेरी लावत आहेत. आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, प्रभाकर शिंदे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव, सरूनाथ उंबरकर, अभिजीत पुंड आदीनी सप्ताहस्थळी भेट देऊन संत गंगागिरी महाराजांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी आमदार खताळ, आमदार लंघे आणि खासदार वाकचौरे यांनी महंत रामगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. रामगिरी महाराज यांनीही उपस्थितांचा संत गंगागिरी महाराजांची शाल देऊन सन्मान केला.
सप्ताहस्थळी केवळ दर्शन घेऊन न थांबता, आमदार खताळ आणि आमदार लंघे यांनी सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळणे पसंत केले. त्यांनी महिला आणि पुरुष भाविकांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यानंतर कुठलाही बडेजाव न मिरवता, सर्वांसोबत पंगतीत बसून त्यांनी महाप्रसाद ग्रहण केला.
दरम्यान, “धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात एकोपा, बंधुभाव आणि सुसंस्कार दृढ होत असतात. अशा सप्ताहांमुळे समाजातील सर्व घटक एकत्र येतात आणि परस्परांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते,” अशी भावना यावेळी आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांनी व्यक्त केली.