कौठे-मलकापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

संगमनेर Live
0
कौठे-मलकापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

◻️​ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कौठे-मलकापूर येथे प्रस्तावित असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या (एमआयडीसी) उभारणीतील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. येथील सरकारी जमिनीवर प्रस्तावित असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला आणि मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, पठारभागातील हजारो युवकांच्या रोजगाराचा मार्ग सुकर झाला आहे.

कौठे-मलकापूर परिसरात एकूण २२७.५३ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. यामध्ये सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमिनीचाही समावेश आहे. मात्र, प्रशासनाने ही जमीन ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’अंतर्गत सौर प्रकल्पासाठी देण्याची कार्यवाही सुरू केली होती.

​औद्योगिक वसाहतीसाठी राखीव असलेल्या या जागेवर परस्पर सौर प्रकल्प आणल्याने स्थानिक ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवला. कौठे-मलकापूर ग्रामसभेने या प्रकल्पाला स्पष्ट नामंजुरी दिली होती. तसेच, ही जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी प्रस्तावित असल्याने ती सौर प्रकल्पाला देणे योग्य नसल्याचा अहवाल तहसीलदारांनीही दिला होता. तरीही कार्यवाही न थांबल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

स्थानिकांचा विरोध आणि संगमनेरच्या औद्योगिक विकासाची गरज ओळखून आमदार अमोल खताळ यांनी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घातले. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना लेखी निवेदन दिले. सदर १०.८३ हेक्टर शासकीय जमीन सौरऊर्जा प्रकल्पासाठी न देता, ती नियोजित औद्योगिक वसाहतीसाठीच हस्तांतरित करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

​आमदार खताळ यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सदर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आता ही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे कौठे-मलकापूर येथे औद्योगिक वसाहत विकसित होण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. पठारभागात नवीन उद्योग आणि गुंतवणूक आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. यामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि परिसराच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी उभारी मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

“संगमनेरच्या औद्योगिक विकासाला प्राधान्य देत स्थानिकांच्या हिताचा निर्णय व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सौरऊर्जा प्रकल्पाऐवजी औद्योगिक वसाहतीसाठी जमीन उपलब्ध होणे, ही संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या सकारात्मक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनःपूर्वक आभार.” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !