देशाच्या सामर्थ्यासाठी राज्यघटना व लोकशाही जपणे काळाची गरज!
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अमृत उद्योग समूहात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या राष्ट्रपुरुषांच्या त्यागाचा आदर राखत देश अधिक समृध्द आणि सामर्थ्यवान बनवण्यासाठी तरुणांनी भारतीय राज्यघटना व लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी कटिबध्द राहिले पाहिजे, असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर (अमृत उद्योग समूह) आयोजित ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात म्हणाले की, “विविध भाषा, धर्म, जात आणि पंथ असूनही भारतीय राज्यघटनेमुळे संपूर्ण देश एका सूत्रात बांधला गेला आहे. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये आपल्याला राज्यघटनेने दिली असून तिने जगाला मानवतेचा संदेश दिला आहे. मात्र, सध्या काही घटक धर्माच्या नावावर राजकारण करून जातीभेद निर्माण करत आहेत, जे देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. गुन्हेगाराला कोणताही धर्म नसतो आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला कडक शिक्षा झालीच पाहिजे.”
स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाचा पुनरुच्चार करताना थोरात म्हणाले की, “थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली आणि १८ महिने कारावास भोगला. त्यांचा हाच पुरोगामी आणि त्यागाचा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यांच्याच आदर्शांवर संगमनेरच्या सहकार आणि शैक्षणिक संस्थांची यशस्वी वाटचाल सुरू आहे,” असे सांगितले.
यावर्षी संगमनेरला स्वतंत्र ‘अमृतवाहिनी विद्यापीठ’ मंजूर झाले ही संपूर्ण तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात म्हणाले की, चांगल्या सहकार आणि दर्जेदार शिक्षण संस्था हे संगमनेरचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आगामी काळात सर्वांनी गुणवत्तेच्या जोरावर या विद्यापीठाचा आणि परिसराचा लौकिक अधिक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अमृत उद्योग समूहातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये पंजाबी भांगडा, गवळण, डोंबारी नृत्य, फ्युजन सॉंग्स, महाराष्ट्राची लोकधारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यगाथा सांगणारा पोवाडा यांसारख्या विविध कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणातून देशभक्तीचा प्रखर जागर करण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. या सोहळ्यास पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.