निमगावजाळी शिवारात चोरट्यांनी तीन घरे फोडली

संगमनेर Live
0
निमगावजाळी शिवारात चोरट्यांनी तीन घरे फोडली

◻️​ १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल चोरीला; आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | निमगावजाळी (ता. संगमनेर) शिवारातील गोरक्षवाडी येथे मंगळवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एकापाठोपाठ एक अशा तब्बल तीन बंद व राहत्या घरांवर धाडसी चोऱ्या केल्या. यात एका शेतकाऱ्याचे कोथिंबीर विक्रीचे १ लाख १० हजार रुपयांची रोकड आणि दीड ते दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

स्थानिकांकडून ​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सर्व ग्रामस्थ गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी गोरक्षवाडी येथील अमोल मच्छिंद्र अरगडे यांच्या घराला लक्ष्य केले. अरगडे कुटुंब घरातील पुढील भागात झोपलेले असताना, चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा कौशल्याने उघडून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी पेट्या व कपाटे थेट जवळील शेतात उचलून नेली. तेथे कपाटांची उचकापाचक करून चोरट्यांनी अमोल अरगडे यांनी नुकतीच कोथिंबीर विकून आणलेले १ लाख रुपये आणि घरातील इतर १० हजार रुपये अशी एकूण १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज घेऊन पोबारा केला.

​यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा संदेश बाळासाहेब चोपडे यांच्या घराकडे वळवला. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत संपूर्ण घरात उचकापाचक केली. मात्र चोपडे कुटुंब कामानिमित्त संगमनेर येथे वास्तव्यास असल्याने घरात मौल्यवान ऐवज नव्हता, ज्यामुळे चोरट्यांना येथून मोकळ्या हाताने माघारी फिरावे लागले. त्यानंतर चोरट्यांनी योगेश विलास वदक यांच्या घरातील सामान बाहेर शेतात आणून उचकापाचक केली, मात्र तेथे त्यांच्या हाती फक्त १५०० रुपयांची रोकड लागली आणि ती घेऊन चोरटे पसार झाले.

​सकाळी नेहमीप्रमाणे अमोल अरगडे व त्यांचे कुटुंब झोपेतून उठले असता, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व मागील दरवाजा उघडा असलेला दिसला. शेतात जाऊन पाहिले असता कपाटे व पेट्या फुटलेल्या अवस्थेत आढळल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. अरगडे यांनी तात्काळ आश्‍वी पोलीस ठाण्याला माहिती दिली. 

माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हे आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. चोरांचा सुगावा लावण्यासाठी नगरवरून श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून श्‍वानपथकाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला आहे, तर ठसेतज्ज्ञांनी कपाट व दरवाजांवरील बोटांचे ठसे गोळा केले आहेत.

सध्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून आश्‍वी पोलीस ठाण्यात अमोल अरगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर १६४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५(a), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार एकूण १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे म्हटले आहे.

शेतकऱ्याने दिवसरात्र मेहनत करून कोथिंबीर विकून कमावलेले पैसेच चोरट्यांनी लांबवल्यामुळे अरगडे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, ग्रामीण भागात एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !