श्रावणाचा उंबरवठ्यावर श्री क्षेत्र निझर्णेश्वर परिसरात दुर्गंधीमुळे भाविकांमध्ये संताप
◻️ कोंची घाट बनला मृत जनावरे, मांस व सडलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा अड्डा
संगमनेर LIVE (अनिल शेळके)| संगमनेर-लोणी मार्गावरील कोंची घाटाच्या उत्तर बाजूस, कोकणगाव शिवापूर लगत असलेल्या ऐतिहासिक श्री क्षेत्र निझर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अस्वच्छतेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास होत असताना, दुसरीकडे मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेसच मृत जनावरे, मांसाचे अवशेष आणि कचऱ्याचे ढीग साचल्याने या पवित्र परिसराला विदारक स्वरूप आले आहे.
श्री क्षेत्र निझर्णेश्वर महादेव मंदिराला मोठे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात येथे महिनाभर मोठा यात्रा उत्सव भरतो. प्रत्येक श्रावणी सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी यांचं रस्त्याने येतात, तर अनेक भाविक पायी चालत या रस्त्यांवरून तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर दाखल होतात. वनविभागाने या परिसराचा विकास केल्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. मात्र, मंदिराच्या पवित्र परिसरात प्रवेश करण्यापूर्वीच भाविकांना दुर्गंधी आणि कुजलेल्या प्राण्यांच्या अवशेषांचा सामना करावा लागत आहे.
या परिसरातील बेजबाबदारपणाचा कळस म्हणजे, नुकतेच एका आजारी गायीला झाडाला बांधून निर्जनस्थळी सोडून देण्यात आले. उपचार आणि पाण्याची सोय न मिळाल्याने या मुक्या जीवाचा तडफडून मृत्यू झाला. मृत्यूनंतरही मोकाट कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने असंवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. कोंची घाटात गाय, बैल, वासरे, म्हशी, शेळ्या, कुत्री, कोंबड्या यांसह विविध मृत प्राण्यांचे अवशेष, पोल्ट्री फार्मची घाण, सडलेला भाजीपाला टाकला जात आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणखी पसरली असून मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने भाविक, वारकरी व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, हा परिसर वनविभागाच्या अखत्यारित असल्याने वनविभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून कचरा व मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी, रस्त्यालगत मृत जनावरे किंवा मांसाचे अवशेष टाकणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि श्रावण सुरू होण्यापूर्वी कोंची घाट परिसराची संपूर्ण स्वच्छता करून तेथे कचरा टाकण्यास पूर्ण प्रतिबंध करावा तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक व निगराणीची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.